शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; जिल्हापेठ पोलिसातही आहे गुन्हा दाखल
जळगाव- शहरातील ओक मंगल कार्यालयाजवळून दुचाकी केल्याचा गुन्हा दाखल होताच अवघ्या दीड तासात गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवून संशयित राहूल सुरेश आखरे वय 23 रा. चौघुले प्लॉट यास चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. जिल्हापेठ पोलिसात संशयिताविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. आठ दिवसांपूर्वीच लुटमारीच्या गुन्ह्यात तो जामीनावर सुटला अन् त्याने ही दुचाकी चोरी केल्याचे समोर आले आहे.
ओक मंगलकार्यालयाजवळून दुचाकी चोरी
नवीपेठेतील समीर कैलास जैन यांचे बी.जे. मार्केट येथे समी एजन्सी नावाचे मेडीकलचे होलसेलचे दुकान आहे. 7 रोजी त्यांनी दुचाकी (क्र. एम.एच.19 ए.ए.1008) ही सकाळी 10 वाजता ओक मंगल कार्यालयाजवळ रस्त्यालगत लावली. अर्धा तासात देशमुख मेडीकल या दुकानावर काम आटोपून जैन परत आले असता, दुचाकी जागेवर दिसून आली नाही. सर्वत्र शोधाशोध करुनही दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली होती.
काही तासातच दुचाकीचोर हुडकला
सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 45 हजार रुपयांच्या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांनी गुन्हे शोध पथकाला सुचना केल्या. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख दिनेशसिंग पाटील यांना ओक मंगलकार्यालयाजवळून दुचाकी चोरणारा संशयित शनिवारच्या भंगार बाजारात गुडगुडीचा खेळ असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील हकीम शेख, संजय शेलार, नितीन बाविस्कर, अनिल कांबळे, राहूल पाटील, किरण वानखेडे यांच्यासह बी.जे. मार्केट परिसरातील भंगार बाजारात सापळा रचला . राहूल सुरेश आखरे यास ताब्यात घेतले. खाकीचा हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. यानंतर त्याने पिंप्राळा हुडको परिसरातील घरात लपविलेली दुचाकी काढून दिली. पोलिसांनी हस्तगत केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका परिस जाधव, राहूल घेटे व मनोज येवूलकर करीत आहेत.
जिल्हापेठला गुन्हा केल्याचे ओळखपरेडमध्ये स्पष्ट
शनिवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हेगारांच्या ओळखपरेडचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राहूल आखरे यासही त्याठिकाणी हजर केले. येथे जिल्हापेठ पोलिसांनी आखरे यास ओळखले व रिक्षात बसून प्रवाशांचे पाकिट लांबविल्याप्रकरणी त्याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल असून त्यात तो आठ दिवसांपूर्वीच जामीनावर सुटला असल्याची माहिती दिली. अशाप्रकारे ओळखपरेडचे महत्व यावेळी स्पष्ट झाले.