आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर जि.प.सदस्याचा आक्षेप

0

जिल्हा आरोग्य अधिकारी विरुद्ध पदाधिकारी वाद पेटण्याची शक्यता

जळगाव: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापुरकर यांच्यावर औषध खरेदीच्या टेंडरमध्ये घोळ, प्रतीनियुक्तीचे आदेश नसतांना प्रतिनियुक्ती करणे यासह कामात अनियमितेचा ठपका ठेवून त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे असा ठराव जि.प. सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. यावरून आरोग्य अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत, जि.प.सदस्य आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले सर्व आरोप निरर्थक असल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी दिले होते, मात्र आता आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जि.प.सदस्य जयपाल बोदडे यांनी आक्षेप घेतले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना कोणाची परवानगी घेऊन पत्रकार परिषद घेतली?, त्यांना सर्वसाधारण सभेतील विषयावर पत्रकार परिषद घेण्याचे अधिकार आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहे. दरम्यान या प्रकरणावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून हा वाद आता पेटण्याची शक्यता आहे.

सभागृहाचा अवमान
जि.प.सदस्य जयपाल बोदडे यांनी आरोग्य अधिकारी डॉ.कमलापुरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत, अधिकाऱ्यांना कामकाजाबाबतचे कागदपत्र सार्वजनिक करता येत नसल्याचा शासन निर्णय दाखविला. आरोग्य अधिकारी यांनी सभागृहाचा अवमान केला असल्याचा आरोप बोदडे यांनी केला आहे. आरोग्य अधिकारी यांनी चरित्र हनन झाल्याचे आरोप केले होते, यावरून बोदडे यांनी एखाद्या जि.प.सदस्याने जर महिला अधिकाऱ्यांना एखाद्या विषयावरून सभागृहात प्रश्न विचारले असेल त्यावरून चरित्र हननाचे आरोप करणे कितपत योग्य आहे. आम्ही बोलू नये असा उद्देश आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.

मी आरोग्य विभागाची प्रमुख असून माझ्यावर झालेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देणे हे माझे कर्तव्य होते. मी विभाग प्रमुख असल्याने पत्रकार परिषद घेण्याचे मला अधिकार आहेच. मी शांत राहून आरोप सहन केले असते तर गैरअर्थ निघेल.
डॉ.बबिता कमलापुरकर: जिल्हा आरोग्य अधिकारी