नूतन मराठा महाविद्यालयात हाणामारीप्रकरणी सव्वा वर्षानंतर अ‍ॅड. विजय पाटील अटक

0

स्थानिक गुन्हे शाखेन केली कारवाई ; जिल्हापेठला परस्पर तक्रारीवरुन आहेत गुन्हे दाखल

जळगाव : गेल्या वर्षी नूतन मराठा विद्यालयात पाटील तसेच भोईटे गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात सुनील भोईटे यांच्या फिर्यादीवरुन दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात तब्बल एक वर्ष 2 महिने व दहा दिवसानंतर अ‍ॅड. विजय भास्कर पाटील रा. दिक्षितवाडी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांडे डेअरी चौकातून ताब्यात घेतले आहे. चौकशी तसेच वैद्यकीय तपासअंती सायंकाळी 6 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात त्यांच्या अटकेची नोंद करण्यात आली . अ‍ॅड. पाटील यांना अटक झाल्याने शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पाटील यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच दरम्यान नरेंद्रअण्णा पाटील समर्थक, कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

काय आहे गुन्हा
19 जून 2018 रोजी दुपारी 03.30 ते 04.30 वाजेच्या दरम्यान नूतन मराठा महाविद्यालय कार्यालयाचे मेन गेट व समोरील रोडवर पाटील तसेच भोईटे समर्थक एकमेकांना भिडले होते. लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड, हॉकी स्टीक तसेच दगडफेकीत जखमी केल्याचे नमूद करून याप्रकरणी सुनील धोंडु भोईटे (52) रा. हितवर्धीनी सोसायटी,जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला विजय पाटील, मनोज पाटील, पियुष पाटील, संजय पाटील सर्व रा.दीक्षितवाडी, अ‍ॅड. भरत पाटील, मनोहर पाटील (सुर्व्हे), रवींंद्र देशमुख, पराग कदम, महेश पाटील, शांताराम पाटील, बाळु चव्हाण, अरूण पाटील, विनोद देशमुख, डॉ.भालेराव साठे, भूषण पाटील, आरीफ शेख, विश्वजीत देशमुख यांच्यासह 29 जणांविरोधात भाग 5 गुरन 97/18 भादंवि कलम 307,324,323,405,506, 143,147,148,149 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे अ‍ॅड. विजय पाटील गटातर्फे महेश पाटील यांनी फिर्याद दिली होती. तर मविप्र कार्यालय दरवाजे तोडफोडप्रकरणी पराग पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.

ताब्यात घेतल्याच्या घटनाक्रम असा
मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकातील सफौ. अशोक महाजन, सुरेश महाजन, सुरज पाटील,अनिल देशमुख, विनोद पाटील, प्रमोद लाडवंजारी, महेश पाटील, संजय सपकाळे ,संदीप साळवे हे कर्मचार्‍यांनी पांडे चौक गाठले. याठिकाणी एका दुकानावर अ‍ॅड. पाटील बसले होते. आपल्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात 307 कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीकामी ताब्यात घेत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगीतले. त्यानुसार शासकीय वाहनातून अ‍ॅड. विजय पाटील यांना पांडे डेअरी चौकातून ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बापू रोहम तसेच पोलीस निरीक्षक अकबर पटेल ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या गुन्ह्याची सर्व कागदपत्रे अभ्यासली.

नरेंद्र अण्णा समर्थकांची पोलीस ठाण्याकडे धाव
घटनेची माहिती कळाल्यानंतर नरेंद्रअण्णा पाटील यांच्या समर्थकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने गर्दी झाली होती. संजय पवार, रा.काँ.चे रवि देशमुख, ज्ञानेश्वर महाजन (माजी नगराध्यक्ष धरणगाव), माहिती कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांच्यासह अंसख्य कार्यकर्ते याठिकाणी थांबून होते. या गुन्ह्यात यापूर्वी हेमंतकुमार साळुंखे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनवर सुटका करण्यात आली आहे.

गुन्ह्यात यांना मिळाला अटकपूर्व जामीन
रवींंद्र शिंदे, चंद्रकांत पाटील, जगदिश पाटील, संजय पवार, सोनल पवार, कुणाल पवार यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात मनोहर पाटील तसेच मनोहर सुर्व्हे अशी दोन नावे समाविष्ट केली आहेत. परंतु दोन्ही नावे ही एकाच व्यक्तीची असल्याने एक नाव वगळण्यात आले आहे. तर अ‍ॅड. भरत देशमुख यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.

कोट
निवडणुका तोंडावर आहेत. पोलिसांना पाहिजे असलेल्या संशयितांची यादी पोलिसांकडे असते. संशयितांची माहिती मिळाल्यानुसार कारवाई होते. त्याच प्रकारे अ‍ॅड. विजय पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथक गेले असता अ‍ॅड. पाटील हे स्वत: पोलिसांना सामोरे आले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जिल्हापेठला त्यांच्याकडून माहिती जाणून घेतल्यानंतर अ‍ॅड. पाटील यांना वाहनात बसवून पोलिसांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आहे.– बापू रोहम, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

अडथळा ठरु नये म्हणून माझ्यावर कारवाई
घरकुल प्रकरणात पाठपुरावा करतोय, 16 तारखेला घरकुलमधील संशयितांच्या जामीनावर कामकाज आहे, यात त्रयस्थ अर्जदार म्हणून मी हरकत घेई, जामीनाला विरोध करेन म्हणून राजकीय दबावापोटी सव्वा वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात व ज्यात मी नव्हतोच, माझे खोटे नाव गोवले होते, आणि भादवि कलम 307 गुन्ह्यात लावण्यात आले मात्र वैद्यकीय अहवाल हा किरकोळ दुखापतीचा आहे. त्यानुसार 323 कलम सुध्दा लागत नाही. मात्र मुद्दाम 307 हे कलम लावण्यात आले आहे. जिल्हा बँकेसह अटलांटा अशा पाच गुन्ह्याचा पाठपुरावा करु नये, आरोपींना वाचविण्यासाठी शासन कामाला लागले आहे. आरोपींना पूर्णपणे संरक्षण देण्यात येत असून त्यांच्या पसंतीचे वकील नेमण्यात येत आहे. या सर्व कारवायांमध्ये मी अडथळा ठरु शकतो, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. माझी मागणी आहे की, पोलीस अधिकार्‍यांचे व राजकीय नेत्याचे काही फोन झाले असतील तर ते कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावे. गुन्हा दाखल झाल्यापासून मी कुठेही बाहेरगावी नव्हतो, मी घरीच आहे, मी फरार नाही. मग आजच कस काय ही कारवाई करण्यात आली. काल घरकुलच्या संशयितांनी दाखल केलेल्या जामीनासाठीच्या अपिलाची एक आठवडा मुदत वाढली. 16 तारखेपूर्वी मी यात जामीनाला मी हरकत घेईल, कारण आम्ही घरकुलच्या गुन्ह्यात तक्रारदार आहोत. घरकुल व इतर गुन्ह्याचा गेल्या 20 वर्षापूर्वी पाठपुरावा करतोय. याच्याबाबत मला वेळावेळी निरोपही आले की, रिकामे कामे करु नको, नाहीतर मोठी कारवाई करण्यात येईल म्हणून मात्र आपण चुकीचे केलेले नाही. आणि चुकीची कारवाई केली तर शासनालाही न्यायालयामार्फत अशी कारवाई कशी व का केली याचा जाब विचारला जाईल.- अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील

एकीकडे घरकुलमधील संशयितांचे अपिल दुसरीकडे तक्रारदार ताब्यात

जळगाव- तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी धुळे विशेष न्यायालयाने सर्व 48 आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावल्यानंतर 28 आरोपींनी वेगवेगळ्या तारखेला जामीनासाठी खंडपीठात अपील दाखल केले. न्या.व्ही.के.जाधव यांच्या पीठासमोर या अपीलांवर कामकाज होत आहे. यात गुलाबराव देवकर, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, अलका लढ्ढा यांच्यासह 28 जणांचे अपील सोमवारी न्या.जाधव यांच्यासमोर आले. घरकुलच्या खटल्यात त्रयस्तदार अर्जदार म्हणून नरेंद्र पाटील यांनी खटल्यात बाजू मांडली होती. त्यांचे बंधू अ‍ॅड. विजय पाटील हे आता या खटल्यात त्रयस्थ तक्रार असून घरकुलच्या निकालानंतर 11 व्या दिवशी त्यांना अटक झाल्यानंतर शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.

या कारणांमुळे गाजलेले आहेत अ‍ॅड. विजय पाटील

1 घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह 48 जणांना दोषी शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात 28 जणांनी खंडपीठात जामीनासाठी अपिल केले आहे. यात अ‍ॅड. विजय पाटील हे त्रयस्थ अर्जदार म्हणून जामीनाला हरकत घेवू शकतात.

2 जळगाव विमानतळ, वाघूर हा तसेच जिल्हा बँक आयबीपी अशा पाच गुन्ह्याप्रकरणी जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्रणपणे गुन्हे दाखल आहेत. या ज्येष्ठ नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रअण्णा पाटील हे तक्रारदार होते. त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे बंधू विजय पाटील हे तक्रारदार आहेत. या गुन्ह्यातील दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी विजय पाटील हेच आता पाठपुरावा करत आहेत.

3 विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी गिरीश महाजन यांच्यावर ही निवडणूकीत मनी पॉवर आणि मसल पावरचा वापर केल्याचा तसेच यात प्रशासनही सहभागी असल्याचा आरोप अ‍ॅड. विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केला होता. या संदर्भात न्यायालयात जाण्याचीही भूमिका अ‍ॅड. पाटील यांनी घेतली होती.

पोलिसांना सव्वा वर्षानंतर ताब्यात घेण्याची आठवण कशी?
ु19 जून 2018 रोजी घडलेल्या नूतन मराठातील हाणामारीप्रकरणी जिल्हापेठला गुन्हा दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून अ‍ॅड. विजय पाटील हे सार्वजनिकरित्या वावरत होते. असे असतांनाही त्यांना गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले नाही. तब्बल 1 वर्ष 2 महिने व 10 दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेला अ‍ॅड. विजय पाटील हे गुन्ह्यात फरार असल्याची आठवण कशी येते, अशा सर्व प्रश्‍नांमुळे हे सर्व प्रकरण संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. यात राजकीय हस्तक्षेप तर झाला नाही ना? असाही सूर जनमानसातून व्यक्त होत आहे.