लवकरच येतोय ‘जेम्स बॉन्ड’ सिरीजचा २५ वा चित्रपट; हे आहे नाव !

0

नवी दिल्ली: हॉलीवूड चित्रपटसृष्टीत ‘जेम्स बॉन्ड’चा सिरीजचा एक मोठा चाहता वर्ग आहे. आता ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजचा २५वा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘नो टाइम टू डाय’ असे असणार आहे. सीरिजचा ३० सेकंदाचा टीजर पोस्टर प्रसिद्ध करण्यात आला असून चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली. भारतात 3 एप्रिल 2020 मध्ये ‘नो टाईम टू डाय’ प्रदर्शित होईल.

हॉलिवुड अभिनेता डॅनियल क्रेग हे पाचव्यांदा जेम्स बॉन्डची भूमिका साकारणार आहेत. भारतात देखील जेम्स बॉन्डचा मोठा चाहता वर्ग असून या २५व्या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता आहे. दिग्दर्शक कैरी जॉजी फुकूनागा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात जेम्स बॉन्डची एक नवी कथा दाखवली जाणार आहे. जेम्स बॉन्डने निवृत्त होऊन जमैकामध्ये शांततेत आयुष्य जगत असताना सीआयएचा त्याचा जुना मित्र त्याला मदत मागतो आणि यानंतर एका अपहृत शास्त्रज्ञाला वाचवण्याचे मिशन सुरु होते, असे याचे ढोबळ कथानक आहे.

‘जेम्स बॉन्ड’सीरिजच्या या 25 व्या चित्रपटाचे शूटींग सुरु असताना अनेक वाद व अपघात झालेत. मे मध्ये शूटींग सुरु असताना डॅनियल के्रग जखमी झालेत. यानंतर त्यांना एक लहान शस्त्रक्रिया करावी लागली होती. जूनमध्ये पाईनवूड स्टुडिओत लावण्यात आलेल्या सेटवर स्फोट झाला होता. या स्फोटात सेटचे प्रचंड नुकसान झाले होते. याच महिन्यात पाईनवूड स्टुडिओच्या फिमेल वॉशरूममध्ये कॅमेरा लपवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली होती.