श्रीनगर-जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३५ ए विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात कलम ३५ ए च्या वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु असून आज एक न्यायमूर्ती अनुपस्थित होते. हे प्रकरण घटनात्मक खंडपीठाला वर्ग करण्याबाबत विचार करु असे मत सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. २७ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.
३५ ए विरोधात जम्मू काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांनी बंद पुकारला आहे. दोन दिवस पुकारण्यात आलेला हा बंद आजही सुरु आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३५ ए वरील आव्हान याचिकांची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. कलम ३५ ए अन्वये जम्मू काश्मीरच्या बाहेरील कुठल्याही व्यक्तीला राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करता येत नाही.
राज्य सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे अर्ज दाखल केला असून काश्मीरमध्ये पंचायत व पालिका निवडणुका होत असल्याने या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की काश्मीर खोऱ्यात सगळीकडे कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत.
बार असोसिएशन तसेच व्यापारी संघटना यांनी बंदला पाठिंबा दिला असून सय्यद अली शहा गिलानी, मिरवैझ उमर फारूख व महंमद यासिन मलिक यांनी बंदचे आवाहन केले होते. काश्मीरध्ये गेले काही दिवस या मुद्दय़ावर निदर्शने चालू असून कलम ३५ ए कायम ठेवावे, यासाठी पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्स यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.