श्रीनगर-उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज पहाटे देखील जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.६ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. तर, हरियाणाच्या झज्जरमध्ये सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. ३.१ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराच्या बाहेर पळ काढला होता. यापूर्वी १० सप्टेंबर रोजीही दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. सोमवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.६ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील खारखुदा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
याशिवाय रविवारीही(९ सप्टेंबर) सायंकाळी ४.३७ वाजता दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हरियाणातील झज्जर येथे भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याने त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. रिश्टर स्केलवर ३.८ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. तसंच ६ सप्टेंबर रोजीही हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. . ३.२ रिश्टर स्केलचा हा धक्का होता.