जम्मूतील पाच जिल्ह्यात मोबाईल सेवा सुरु !

0

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कमल ३७० रद्द केल्यानंतर तेथील शासकीय कार्यालये, मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. जम्मू-काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पाऊले उचली जात आहे. काश्मीरातील शासकीय कार्यालये, शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता जम्मूतील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात संचारबंदीसह दूरसंचार, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. याचा परिणाम स्थानिकांच्या जीवनावर झाला आहे. दूरसंचार सेवा बंद असल्याने नागरिकांना प्रशासनाने सुरू केलेल्या फोन सेवेसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. काश्मीर खोऱ्यातील हे निर्बंध उठवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, परिस्थितीचा आढावा घेऊन ही बंधने हटवण्यात येतील, अशी भूमिका प्रशासनाने न्यायालयात मांडली होती. न्यायालयानेही प्रशासनाला वेळ देण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

सध्या जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासन बंधने शिथिल करीत आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच जम्मूतील जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियाशी या पाच जिल्ह्यात २जी इंटरनेट सेवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासनाने जम्मूतीलच दोडा, किश्तवर, रामबण, राजौरी आणि पुछं या जिल्ह्यात मोबाईल सेवा सुरु करण्यात आली आहे.