श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या मंत्रीमंडळात आज मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यात गांधीनगरचे आमदार कविंदर गुप्ता यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. निर्मल सिंग यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदावर गुप्ता यांची वर्णी लागली आहे.
फेरबदलाअंतर्गत सर्वच नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज दुपारी पार पडला. या सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे देखील उपस्थित होते. राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी नवीन नियुक्ती झालेल्या मंत्र्यांना शपथ दिली.
यांचा समावेश
१) मोहम्मद खलील बंद – पुलवामा मतदारसंघ (पीडीपी)
२) मोहम्मद अश्रफ – सोनवार (पीडीपी)
३) राजीव जसरोटीया – कठुआ (भाजप)
४) देवींदर कुमार मनयाल – सांभा (भाजप)
५) शक्ती राज – दोडा (भाजप)
दरम्यान वाहतूक राज्यमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या सुनील कुमार शर्मा यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली आहे. १७ एप्रिलला भाजपने राज्य सरकारमधील त्यांच्या ९ मंत्र्यांना फेरबदलांसाठी राजीनामे सादर करण्यास सांगितले होते.