जम्मू कश्मीर :- जम्मू-काश्मीरमधील खोऱ्यात गुप्तचर विभागाने हायअलर्ट जारी केले आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीमधून दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे. सुमारे २० दहशतवादी नियंत्रण रेषा पार करत काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
घुसखोरी करणारे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे
दहशतवादी काश्मीरमध्ये हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खासकरुन काश्मीर खोऱ्याला लक्ष केले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून राज्यातील संवेदनशील भागांमध्ये पहारा ठेवण्यास सांगण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरुनच पाकिस्तानात बसलेले हॅण्डलर्स काश्मीरमध्ये हिंसा घडत राहावी यासाठी किती प्रयत्न करत आहेत हे दिसत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. घुसखोरी करणारे दहशतवादी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे असल्याचे समजत आहे.