हवेली महसूल विभागाकडून वाळूसाठाही जप्त
न्हावी सांडस वाळूचोरीचा जनशक्तिने केला होता पर्दाफाश
वाघोली : न्हावी सांडस येथे दिवसा तसेच रात्रीच्यावेळी बोटीच्या सहायाने आठ महिन्यांपासून बिनधास्तपणे चालू असलेल्या वाळूतस्करीबाबत दैनिक जनशक्तिने बातमी प्रसिद्ध करताच हवेली उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार प्रशांत मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील शेळके यांच्या पथकाने चार बोटी जप्त करत वाळूतस्करांना जोरदार दणका दिला आहे. मंडलाधिकारी यांनी ताबेपावती करून न्हावी सांडसचे पोलिस पाटील, कोतवाल यांच्या ताब्यात या जप्त बोटी दिल्या आहेत. त्याचबरोबर गावठाण हद्दीतील 10 ब्रास वाळूसाठ्याचा पंचनामा करून कारवाईदेखील करण्यात आली आहे.
.. अन् वाळूतस्कर गायब झाले
खुलेआम चालू असलेल्या वाळूतस्करीची पोलखोल दैनिक जनशक्तिमधून होताच न्हावी सांडस (ता. हवेली ) येथील भीमा नदीपात्रात तस्कारांनी वाळूचोरी तत्काळ बंद करून बोटी भीमा नदीपात्रातून काढून गर्द झाडीत लपवून पसार झाले होते. हवेलीच्या महसूल विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी पाहणी केली असता, लपवून ठेवलेल्या बोटी निदर्शनास आल्यात. या बोटी ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करण्यात आला. मंडल अधिकारी दीपक चव्हाण यांनी न्हावी सांडसचे पोलिस पाटील यांच्या ताब्यात चोरीच्या चार बोटी दिल्या आहेत. बोटी सापडल्या असल्या तरी त्या कोणाच्या मालकीच्या आहेत हे समजू शकले नाही. कारण पंचनामा करत असताना कोणीही पुढे आले नाही. याच बोटींच्या मदतीने न्हावी सांडसमध्ये वाळूचोरी जोमात सुरू होती. वाळूतस्कर गायब झाले असले तरी त्यांना शोधणे काही अवघड नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. कारण बेकायदा वाळूउपसा होत असताना अनेक जणांनी बोटींच्या चित्रफिती मोबाईलमध्ये संग्रहित केल्या आहेत.
भवरापूर येथील पुनरावृत्ती
आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदा वाळूचोरीबाबत संबंधित कर्मचार्यांनी व अधिकार्यांनी एवढे महिने उदासीनता का दाखवली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठमोठ्या बोटी गावात दाखल झाल्या तेव्हा गावपातळीवर असणारे शासनाचे प्रतिनिधी, पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक यांना कसे दिसले नाही? गावपातळीवरच्या या शासकीय कर्मचार्यांना थोडेथोडके नव्हेतर आठ महिन्यांपासून खुलेआम सुरू असलेला वाळूउपसा कसा दिसला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही भवरापूर येथील पुनरावृत्ती असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. यामध्ये संबंधित महसूल विभागाने ठोस कारवाई केल्यास अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भवरापूर येथील पोलिस पाटलाच्या ताब्यातील वाहने गायब झाली होती तोच प्रकार न्हावी सांडस येथील पोलिस पाटलाकडून होणार तर नाही ना; याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाळूतस्कर लवकरच सापडतील
बोटीद्वारे वाळूची तस्करी होत असताना चित्रफितीमध्ये बोटीवर काही चोरटे दिसत असल्यामुळे वाळूचोराचा शोध घेणे महसूल विभागाला सोपे होणार आहे. त्यादृष्टीने महसूल विभागाची करडी नजर असल्याने लवकरच वाळूतस्कर सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.