जनशक्ती विशेष : रिक्त पदांसाठी पदवीधर शिक्षकांच्या ‘नेमणुका’ रखडल्या !
जि.प.च्या शिक्षण विभागाकडून केवळ मिळतेय ‘आश्वासन’
शरद भालेराव | जळगाव | जिल्ह्याभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उच्च प्राथमिक विज्ञान आणि गणित विषयांसाठी पदवीधर शिक्षकांच्या तब्बल 350 जागा आजही रिक्त आहेत. जि.प.च्या शिक्षण विभागातील जी.आर.नुसार बीएस्सी पदवी प्राप्त उपशिक्षकांना या पदावर त्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. असे असूनही गेल्या दोन वर्षांपासून अशा शिक्षकांच्या प्रस्तावांच्या फाईल पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पात्र शिक्षकांच्या ‘नेमणुका’ रखडल्याची ओरड शिक्षकांनी केली आहे. शिक्षण क्षेत्रात विज्ञान आणि गणित अशा दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर शिक्षकांच्या नेमणुका न
झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात रिक्त पदांचा आकडाही दिवसेंदिवस वाढणार आहे. अशातच शिक्षण विभागाकडून लवकरच रिक्त पदे भरण्याचे केवळ ‘आश्वासन’ मिळत आहे. रिक्त पदांसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना तशा आशयाचे निवेदनही लवकरच शिक्षक संघटनांकडून देणार असल्याचा सूर शैक्षणिक क्षेत्रातून उमटत आहे.
जिल्हा परिषदेतील पदवीधर शिक्षक, ग्रेडेड मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि विषय शिक्षकांची विविध पदे जिल्ह्याभरात अद्यापही रिक्तच आहेत. ही पदे भरण्यासाठी अनेकवेळा विविध शिक्षकांच्या संघटनांनी आंदोलन करुन आक्रमक झाले आहेत. असे असूनही जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रश्नांकडे जणू पाठच फिरविल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून उमटू लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही. जिल्ह्यातील बहुतांश पात्र शिक्षक, मुख्याध्यापक हे तर पदोन्नतीविनाच सेवानिवृत्त झाल्याचे अनेकांनी सांगितले. त्यामुळे अनेक पात्र शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकला नसल्याची खंतही अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांना शिक्षण विभागाकडून मिळालेली आश्वासने निव्वळ ‘फोल’ ठरली आहे.
रिक्त पदांवर शिक्षकांची त्वरित नेमणूक करा
जिल्ह्याभरात जि.प.च्या शाळांमध्ये उच्च प्राथमिकच्या विज्ञान आणि गणित विषयासाठी तब्बल 350 जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यासाठी पदवी प्राप्त उपशिक्षकांच्या या पदावर नेमणुका करण्याची गरज आहे. यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावांच्या फाईलही पूर्ण झाल्या आहेत. पात्र शिक्षकांच्या नेमणुका करण्यासाठी पात्र शिक्षक नेमणुकीसाठी अद्यापही चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याचा संतप्त सूर आता पात्र शिक्षकांमधून उमटू लागला आहे. लाखोंचे अनुदान येऊनही (ऑपरेशन थिएटर आहे मात्र डॉक्टर नाही) त्याचा उपयोग काय? असा प्रश्नही पात्र शिक्षकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षकांची नेमणूक झाल्यावरच त्या साहित्यांचा वापर होईल, असाही सूर उमटत आहे. त्यामुळे जि.प.च्या शिक्षण विभागाने लवकरात लवकर पात्र पदवीधर शिक्षकांची विज्ञान आणि गणित विषयावर नेमणूक करावी, अशी रास्त अपेक्षा पात्र शिक्षकांनी व्यक्त केली आहे.