अमोल कोल्हेंच्या त्या आरोपावरून जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचे मोफत तिकीट दिले नाही म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नाटक रोखण्याची धमकी दिल्याचं अमोल कोल्हे म्हणाले. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, लोकसभेचे सदस्य व लोकप्रिय कलाकार असलेले डॉ. अमोल कोल्हे हे सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे प्रयोग राज्यभर करत आहेत. राज्यभर त्यांच्या प्रयोगांना उदंड प्रतिसाद मिळत असून छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवन व कार्याविषयी जनजागृती होत आहे.

मात्र पिंपरी चिंचवड पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी या महानाट्याचे मोफत पास न मिळाल्यास नाटकाचे शो बंद पाडण्याची धमकी दिली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलीस दलाचे काम असून अशा काही निवडक लोकांच्या मुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यात त्वरित लक्ष घालावे, असं जयंत पाटील म्हणाले.