बँकेची तिजोरी ‘जैसे थे’ : आरडाओरड होताच चोरट्यांचे पलायन
चाळीसगाव,- चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड येथे असलेल्या जिल्हा बँकेचे शाखा फोडून तिजोरी पळविण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून मंगळवारी करण्यात आला. यावेळी मोठा आवाज झाल्याने घर मालक डॉ.संदीप देशमुख बाहेर आले असता चोरट्यांनी घटनास्थळी तिजोरी सोडून पलायन केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील हिरापुर रोड येथे गणेश मंगल कार्यालयाच्या बाजूला भर रस्त्यावर असलेल्या जिल्हा बँकेची विस्तारित कक्षाची शाखा आहे. शाखाधिकारी स्मिता चव्हाण व एक महिला कर्मचारी या सोमवारी दैनंदिन कामकाज आटोपून बँकेला कुलूप लावून सायंकाळी घरी गेल्या. मंगळवारी सकाळी चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी शटर फोडून बँकेत प्रवेश करून तिजोरीत ठेवलेले दोन लाख ६१ हजार रुपये पळवण्याचा प्रयत्न केला.
पांढर्या रंगाच्या तवेराने चोरट्यांचा पळ
परंतु जिल्हा बँकेची तिजोरी ही मजबूत असल्याने ती चोरट्यांकडून फुटली नाही म्हणून चोरट्याने तिजोरीच पळवून नेण्याचा डाव रचला. यावेळी येथे राहणारे डॉ. संदीप देशमुख यांना आवाज आल्याने ते बाहेर आले. ही बाब लक्षात घेऊन चोरट्यांनी तिजोरी अंगणातच सोडून पांढर्या रंगाच्या तवेरा कार मध्ये पलायन केले. सकाळी पाच वाजता ही घटना उघडकीस येतात घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी उत्तम कडलग, शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. घटनास्थळावरून जुन्या हिरापूर नाक्यापर्यंत श्वानपथकाने जाऊन पाहणी केली. एका आठवड्यातच दोन ठिकाणी मोठ्या चोर्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाखाधिकारी स्मिता चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही करीत आहेत.