पंचशी वाद घालणे जेसन रॉयला भोवले; आयसीसीकडून दंड !

0

बर्मिंगहॅम : इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचे 224 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 32.1 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 1992नंतर इंग्लंड प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. पण, या सामन्यात इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉयने पंचांशी हुज्जत घालून स्वतःवर संकट ओढावून घेतले आहे. रॉयला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शिक्षा सुनावली आहे. रॉयला सामन्यातील मानधनातील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

20 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीनं बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेने गेला होता, त्यावर रॉयने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, बॅट आणि चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही, तरीही ऑसी खेळाडूंनी अपील केले. बऱ्याच वेळ अपील केल्यानंतर पंच कुमार धर्मसेनाने त्याला बाद ठरवले. त्यानंतर रॉयने तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. या प्रकरणी आयसीसीने रॉयला शिक्षा सुनावली आहे. शिवाय त्याला दोन डिमेरिट्स गुणही मिळाले आहेत. पण, तो अंतिम फेरीत खेळणार आहे.