पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराकडे मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री दुर्लक्ष करीत आहे. मुख्यमंत्री जागेवर बटन दाबून उद्घाटने करतात. त्यांच्याकडे उद्घाटने करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे आमदार जोडीला विचारण्यासाठी कोणीच राहिले नाही. आमदारांचे ‘तुम्ही आम्ही भाऊ-भाऊ दोघे मिळून खाऊ, खाऊ’ असा कारभार सुरु असल्याचा हल्लाबोल अजित पवार यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर केला.
मी चुकलो तर पवारसाहेब माझी चूक काढायचे
राष्ट्रवादीची भोसरीमध्ये आढावा बैठक झाली. यावेळी अजित पवार म्हणाले, मी राज्यभरात काम करत असताना काही चुकलो तर शरद पवारसाहेब मला सांगतात. माझी चूक दाखवितात. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना एखादे चुकीचे काम असेल तर ते मी होऊ देत नव्हतो. शहराचे नाव खराब होणारी कामे करु देत नव्हतो. आता भाजपच्या राजवटीत या आमदार मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत. कच-यात देखील पैसे खातात. रस्त्यांच्या इकडले तू खा आणि तिकडले मी खातो असा यांच्या कारभार सुरु आहे. महापालिकेतील टेंडर आमदारांच्या नातेवाईकाला दिली जातात. मेट्रोला आम्ही परवानगी दिली. पिंपरी-चिंचवड शहरात त्याचे काम देखील वेगात सुरु आहे. परंतु, पुण्यात अद्याप एक खांब देखील उभा राहिला नाही. एका खांब उभा राहिला होता. तो देखील पडला असल्याचे, पवार यांनी सांगितले. मेट्रोला भाजपच्या नेत्यांमुळेच विलंब झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला.