मुंबई : डॉक्टरांवरील हल्ल्याची प्रकरणे सुरुच आहेत. मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकड़ून मारहाण करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाची तोडफोडही केली. जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सातच्या सुमारास दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ११ सर्जरी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या मारहाणीचा व्हीडिओ ही समोर आला आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५३ आणि ३३२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकेअर कायद्यासोबतच आरोपींवर तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर्स संघटनेकडून निषेध
दुसरीकडे, या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना म्हणजेच मार्डकडून दुपारी निषेध करण्यात आला. मारहाणीत जखमी झालेल्या एका डॉक्टरवर उपचार सुरु आहेत.