पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानाला प्रात्यक्षिकाची जोड द्यावी

0

दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी यांचे मत

जळगाव : पत्रकारिता ही केवळ नोकरी नसून मोठी सामाजिक जबाबदारी देखील आहे. यासाठी समाजात पत्रकार म्हणून वावरतांना स्वत:वर नैतिक बंधने स्वत:च लादून घेतली पाहिजेत, असे मत दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी यांनी आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मू.जे.महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात आयोजित ‘पत्रकारिता नीतिमूल्ये’ या विषयावर बोलतांना व्यक्त केले. पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानाला प्रात्यक्षिक कामाची जोड दिल्यास भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होवू शकतात, असेही ते म्हणाले. यावेळी दै.जनशक्तिचे डिजीटल विभाग प्रमुख तुषार भांबरे, प्रा.राजेश वाघुळदे, अभय सोनवणे व जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार उपस्थित होते.

भारतीय नागरिकांना वैचारिक, अभिव्यक्ती स्वांतत्र्य


पहिल्या प्रेस कमिशनने प्रेस कौन्सिलची कल्पना भारतातील प्रेसच्या स्वातंत्र्याचे रक्षण आणि पत्रकारितेतील उच्च मानके निश्चित करण्याच्या उद्देशाने केली. याचा परिणाम म्हणून 4 जुलै 1966 रोजी भारतात प्रेस कौन्सिलची स्थापना झाली व 16 नोव्हेंबर 1966 पासून त्याचे औपचारिक काम सुरू झाले. त्यानंतर आजपर्यंत 16 नोव्हेंबर हा दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जगात लोकशाही आणि स्वातंत्र्य बळकट करण्याकरिता झालेल्या विविध चळवळींमुळे, तसेच बौद्धिक व न्यायिक चिकित्सांमधून अभिव्यक्तीस्वातंत्र्यास मूलभूत स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. तसेच, या स्वातंत्र्याच्या व्याख्येच्या कक्षा अधिकाधिक विस्तारित ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचे महत्त्व भारतानेच नव्हे तर जागतिक स्तरावर मान्य केले गेले आहे. भारतीय राज्यघटनेत सर्व भारतीय नागरिकांना वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यचा समावेश आहे. यामुळे प्रत्येकाची जबादारी निश्चितपणे वाढली आहे, असेही डॉ.परदेशी यांनी नमूद केले.

डिजिटल माध्यमातील संधी विषयावर मार्गदर्शन

यावेळी तुषार भांबरे यांनी ब्लॉग कसा तयार करावा त्यातील कौशल्य कसे आत्मसात करावे त्यासोबत डिजीटल माध्यमातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख संदीप केदार यांनी केले. यावेळी प्रा.केतकी सोनार, संजय जुमनाके, जनसंवाद आणि पत्रकारिता एम.ए. प्रथम वर्ष व रेडीओ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.