प्रतिनिधी तळोदा :–
तळोदा शहरासह तालुक्यात दि.२७ ऑगस्ट २०२३ रोजी कानुमातेची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात येऊन दुसऱ्या दिवशी दि.२८ ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
कानुमातेचे रोट तयार करण्याची लगबग, घरोघरी वाजणारी कानुमातेची गीते आणि मातेचा जयघोष करीत एका दिवसाच्या मुक्कासाठी आलेल्या खान्देशाची कुलदैवत कानुबाई मातेची दि.२७ ऑगस्ट रोजी विधीवत स्थापना करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजेनंतर कानुबाई मातेच्या दर्शनासह रोट पूजनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत असते. तसेच रात्री कानुमातेच्या जागरणासाठी विविध गाण्यांवर ठेका धरत भाविक नृत्य करतात. तर दुसऱ्या दिवशी कानुमातेला मनोभावे निरोप देण्यासाठी सकाळी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
कानुमातेचा उत्सवा निमित्ताने कुटूंबातील गोतावळा एकत्र येत असतो. यानिमित्त नोकरी, व्यवसाय व विविध कारणांमुळे लांब असलेली भाऊबंदकीची कुटुंब एकत्र येतात. खान्देशाची कुलदैवत कानुबाई मातेच्या उत्सवाला पारंपारिक व धार्मिक महत्त्व आहे. खान्देशात नागपंचमी नंतरच्या रविवारी व सोमवारी कानुमातेचा उत्सव साजरा करण्यात येत असतो. यावर्षीही कानुमातेचे जल्लोषात स्वागत करण्यात येऊन एका दिवसाच्या मुक्कामाला येणाऱ्या मातेच्या उत्सवासाठी रात्रभर जागरण करत असतात. या उत्सवामुळे गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
तर दुसर्या दिवशी कानुमातेला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. यासाठी सकाळी नऊ वाजेपासून कानुमातेच्या विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व कानुमाता मुख्य चौकात एकत्र येऊन कानुमातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. व गावाबाहेरील विहिरीवर कानुमातेचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.