अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीत समाज बांधवांचा जल्लोष

प्रतिनिधी । वरणगाव

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वरणगांव शहरात समाज बांधवांनी सवाद्य मोठ्या जल्लोषात साजरी केली . तर मिरवणूकीतील देखाव्याने शहरवासीयांचे लक्ष वेधले.

वरणगांव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीला सिध्देश्वर नगर भागातुन सुरुवात करण्यात आली. मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आलेल्या मिरवणूकीत ढोल – ताशे व डिजेच्या तालावर समाज बांधवांनी नाच गाण्याचा ठेका धरीत अण्णाभाऊ साठेंचा जयघोष केला . मिरवणूकीत अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याची सजवलेल्या रथातुन तसेच अण्णाभाऊ साठे लिखित कांदबरीचा देखावा सादर करण्यात आला होता. मिरवणूकी दरम्यान शहरातील मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून समाज बांधवांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. यामध्ये शिवसेना ( उबाठा ) जिल्हाप्रमुख समाधान महाजन ( सर ), माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, राष्ट्रवादीचे राजेंद्र चौधरी यांचेसह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता .सिध्देश्वर नगर भागातुन सकाळी ११ वाजेला सुरूवात झालेल्या मिरवणूकीचा ३ वाजेदरम्यान शहरातील अण्णाभाऊ साठे नगरा जवळ समारोप झाला . मिरवणुकीसाठी विर लहुजी साळवे मित्र मंडळ, लहुजी क्रांती सेना व जयभाऊ चांदणे मित्र परिवाराने परिश्रम घेतले. तसेच वरणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी व पोलीस, होमगार्ड बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.