नवी दिल्ली-केंद्र सरकारने यापूर्वी उत्तरराखंड हायकोर्टाचे न्यायाधीश के.एम.जोसेफ यांना सुप्रीम कोर्टात बढती देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, पुन्हा एकदा यावरुन वाद निर्माण झाला असून सरकारकडून न्या.जोसेफ यांची सेवाज्य़ेष्ठता घटवण्यात आल्याने सुप्रीम कोर्टाचे नाराज न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेणार आहेत.
केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकात न्या.जोसेफ यांचे नाव तिसऱ्या स्थानी ठेवले आहे. त्यामुळे काही न्यायाधीश नाराज झाले आहेत. त्यामुळे ही मंडळी सरन्यायाधीशांना भेटून मंगळवारी होणाऱ्या शपथविधीपूर्वीच या परिपत्रकात सुधारणा करण्याची विनंती करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या काही सदस्यांनी देखील या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या वाद सुरु आहे.
केंद्र सरकारने न्या. जोसेफ यांच्यासह मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि ओडिशा हायकोर्टाचे मुख्य न्यायधीश विनीत सरन यांच्या नावांच्या शिफारशींची फाईल मंजूर केली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजिअमने १० जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या रुपात न्या.जोसेफ यांच्या नावाची शिफारिश केली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतरच सुप्रीम कोर्टात मोठा विरोध पहायला मिळाला होता.
१२ जानेवारी रोजी न्यायवृंदाच्या न्या.चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरिय़न जोसेफ या चार न्यायाधीशांची सरन्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेत खटले वाटपांमध्ये नियमावलींचे पालन केले जात नसल्याचा आरोप केला होता.