मुंबई| मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी कादिर अहमद याला शनिवारी तब्बल 24 वर्षांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आरोपी टायगर मेमन याने पाठवलेली शस्त्रास्त्रे आणि स्फोटके गुजरातमधील जामनगर येथे उतरवण्यासाठी कादिरने मदत केली होती, असा त्याच्यावर आरोप आहे. गुजरात पोलिसांनी कादिरविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. कादिरला गुजरात येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश एटीएसचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी दिली.
यूपी एसटीएसच्या माहितीनुसार, कादिर बिजनौरमधील नजिबाबाद येथील रहिवासी आहे. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील तो आरोपी आहे. बॉम्बस्फोट घडवण्यासाठी मेमननं आणलेली स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जामनगर येथे उतरवण्यासाठी कादिरनं टायगर मेमनला मदत केली होती, असा त्याच्यावर आरोप आहे. कादिरची सध्या चौकशी सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान, गेल्याच महिन्यात मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयानं अबु सालेमसह सहा आरोपींना दोषी ठरवले होते.
Web Title- kadir ahemad arrested after 24 years