आयपीएस अधिकाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

0

कानपूर- दोन अधिकाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याने आज बुधवारी उत्तर प्रदेश हादरून गेले. कानपूरमधील आयपीएस अधिकारी शहर पोलीस अधीक्षक सुरेंद्रकुमार दास यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे गोरखपूर पुर्वोत्तर रेल्वेतील उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक तरूण शुक्ला यांनीही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या दोन घटनांमध्ये उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलाहामुळे सुरेंद्रकुमार दास हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. त्या तणावाखाली त्यांनी हे पाऊल उचलले असेल, अशी शक्यता त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पोलीस अधीक्षक सुरेंद्रकुमार दास यांना सध्या जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती नाजूक असून येते काही तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. बुधवारी सांयकाळी ४ वाजता पुन्हा एकदा मेडिकल बुलेटिन जारी केले जाणार असल्याचे रिजेन्सी रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

सुरेंद्रकुमार यांनी विष प्राशन केल्याचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रूग्णालयात धाव घेतली. सुरेंद्रकुमार दास हे २०१४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्याच महिन्यात त्यांची कानपूरला बदली झाली होती. त्यांची पत्नी कानपूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार ते उत्तर प्रदेशमधील बलिया येथील रहिवासी आहेत.

सुरेंद्रकुमार दास हे कौटु्ंबिक कलहामुळे चिंतेत होते, असे कानपूर पश्चिम विभागाचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले. या तणावातूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.