बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात रंगत येण्याची शक्यता आहे. सिध्दरामय्या सरकारचा पाडाव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी दोन आठवड्य़ांची मुदत शिल्लक आहे.
येत्या १० मे’ला सायंकाळी पाच वाजता प्रचाराचे सूप वाजणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत. उद्यापासून (१ मे) पंतप्रधान आपल्या प्रचार दौऱ्याला सुरूवात करतील. पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या ३० आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ २० सभा होणार आहेत. अमित शाह गेल्या आठवड्याभरापासून कर्नाटकात तळ ठोकून आहेत. दक्षिण भारतात भाजप अजूनही स्थान निर्माण करू शकलेला नाही. त्यामुळे कर्नाटक निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.