मुंबई: कर्नाटकमधील सत्तातरांचे नाट्य थांबण्याचे नाव घेत नसून बंडखोर आमदारांनी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद यांची भेट नाकारली आहे. आमदारांनी जेष्ठ नेत्यांना भेटण्यास मनाई करण्यात यावी अशी विनंती पत्र पोलिसांना दिले आहे. जेष्ठ नेते हे आम्हाला बळजबरीने भेटत असून त्यांना नकार देण्यात यावा असेही म्हटले आहे. कर्नाटक मधील १४ आमदार हे मुंबईत हॉटेल मध्ये आले आहेत. पवईच्या हॉटेल रेनिसन्समध्ये थांबलेले आहेत.
कॉंग्रेसच्या नेत्यासोबत आमची कुठली बैठक ठरली नसून, आम्हाल त्या बाबतीत काही माहिती नाही असे पत्र त्यांनी पोलिसांना लिहिले आहे. जेष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी रोखावे, अन्यथा काही विपरीत घडू शकते असे ही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या कर्नाटकातील १४ बंडखोर आमदारांनी पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना त्यांच्या सह्यांचे पत्र दिले आहे. आम्ही कर्नाटक विधानसभेचे सदस्य आहोत. सध्या आम्ही पवईच्या हॉटेल रेनिसन्समध्ये थांबलेलो आहोत. मल्लिकार्जुन खरगे आणि गुलाम नबी आझाद यांच्यासोबत आमची कोणतीही बैठक ठरलेली नाही किंवा अशा कोणत्याही बैठकीबाबतचं आम्हाला माहीत नाही.
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यांसोबत आमची बैठक ठरलेली नाही. काही काँग्रेस नेते आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, या नेत्यांना आम्हाला भेटण्यापासून रोखावे अन्यथा काही तरी विपरीत घडू शकतं, असं या पत्रात काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.