कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच वरचढ

0

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकांमुळे कर्नाटकातील वातावरण तापले असून 12 मे रोजी येथे मतदान आणि 15 मेरोजी मतमोजणी होणार आहे. प्रामुख्याने काँग्रेस, भाजपा आणि जनता दल (सेक्यूलर) यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. मात्र पोलनुसार, काँग्रेस हा भाजपपेक्षा चांगली कामगिरी या निवडणुकीत करणार असला तरी दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणार्‍या 113 जागा जिंकू शकणार नाहीत, असा अंदाज आहे. टाइम्स नाऊने हा पोल जाहिर केला आहे.

काँग्रेस 93 जागांवर विजयी होईल
आतापर्यंत करण्यात आलेल्या पोल्सना एकत्र करुन टाइम्स नाऊने हा पोल केला आहे. तीन पोल्सच्या आधारे ही आकडेवारी काढण्यात आली आहे. या पोलनुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेस 93 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या 23 एप्रिलच्या सर्व्हेनुसार काँग्रेस 91 जागा जिंकू शकते. तर जैन युनिव्हर्सिटी आणि सीएसडीएसने केलेल्या सर्व्हेत काँग्रेसला 88 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीटीव्ही आणि एनजीच्या सर्व्हेत काँग्रेस 80 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तिन्ही पोल्सच्या आधार काढण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपा 87 जागा जिंकू शकते. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या सर्व्हेनुसार भाजपा 89, जैन युनिव्हर्सिटी आणि सीएसडीएसनुसार 92 आणि एनडीव्ही-एनजीच्या सर्व्हेत भाजपा 80 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षासोबत युती करत निवडणुकीत उतरलेल्या जनता दलासमोर (सेक्यूलर) मात्र आव्हान कायम असणार आहे. हा पक्ष गेल्या 10 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. टाइम्स नाऊच्या पोल ऑफ पोल्सच्या भविष्यवाणीनुसार, जनता दल (सेक्यूलर) 38 जागाच जिंकू शकते. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या सर्व्हेनुसार 40, जैन युनिव्हर्सिटी आणि सीएसडीएसनुसार 35 आणि एनडीव्ही-एनजीने 38 जागांची भविष्यवाणी केली आहे.