कर्नाटकच्या राजकारणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण; उद्या निकाल

0

नवी दिल्ली: कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज मंगळवारी १६ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र निकाल राखीव ठेवण्यात आला असून तो उद्या सकाळी १०.३० वाजता जाहीर होणार आहे. न्यायालयात दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. विधानसभा अध्यक्ष राजीनामे स्वीकारत नसल्याचे बंडखोर आमदारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तर सद्यस्थिती कायम ठेवण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देणार, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. केंद्र सरकारचे महाधिवक्ते राहिलेल्या रोहतगींनी बंडखोर आमदारांची बाजू न्यायालयात मांडली. विधानसभा अध्यक्षांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवींनी बाजू मांडली.

गुरुवारी (१८ जुलै) कर्नाटकच्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्याआधी उद्या यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. आज या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. या दरम्यान बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून राजीनामा स्वीकारत नसल्याचा युक्तिवाद बंडखोर आमदारांनी केला. तर आमदारांच्या राजीनाम्यावर बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी न्यायालयाला सांगितले.