बंगळूर: कर्नाटकातील राजकीय घडामोडीनंतर कॉंग्रेस-जेडीएसची सरकार कोसळून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला. पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदी पुन्हा बी.एस.येडीयुरप्पा विराजमान झाले आहे. त्यानंतर आज मंगळवार २० रोजी मंत्रिमडळाचा पहिला विस्तार करण्यात आला आहे. ज्यामध्ये १७ आमदारांना संधी देण्यात आली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी राजभवनात नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आलेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यासह के.एस.ईश्वरप्पा व आर.अशोक हे दोन माजी उपमुख्यमंत्री, अपक्ष आमदार एच.नागेश आणि लक्ष्मण सावदी, श्रीनिवास पुजारी यांचा समावेश आहे. यांच्याशिवाय गोविंद एम. करजोल, अश्वथ नारायण सी. एन, बी. श्रीरामुलु, एस. सुरेश कुमार, वी. सोमन्ना, सी. टी. रवि, बासवराज बोम्मई, जे. सी. मधु स्वामी, सी. सी. पाटील, प्रभु चौहान आणि शशिकला जोले अण्णासाहेब यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमडळात स्थान दिल्या गेलेल्या शशिकला जोले अण्णासाहेब ह्या एकमेव महिला आमदार आहेत. कर्नाटकात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत ३४ मंत्रीच असू शकतात. काँग्रेस आणि जेडीयूने मंत्रिमंडळ विस्तारास होणाऱ्या विलंबावरून भाजपावर टीका करत, सरकारच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेसने म्हटले होते की, येडियुरप्पांचे एक सदस्यीय मंत्रिमंडळ हे राष्ट्रपती राजवटी सारखे वाटत आहे.