कर्नाटकात भाजपच मोठा पक्ष; चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाकीत

0

कर्नाटक :- कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर टाइम्स नाऊ–टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा कर्नाटकात १२० जागांवर विजय मिळवेल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तसेच काँग्रेसला ७३, जेडीएस(+) २६ जागा आणि इतरांना ३ जागा मिळण्याची शक्यता दर्शवली आहे. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत ११३ हा बहुमताचा आकडा आहे.


 

कर्नाटकातले पुढील सरकार भाजपाचेच
कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ जागांवर मतदान झालेय, त्यामुळे उरलेल्या दोन जागा सोडल्या तरीही या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकातलं पुढील सरकार भाजपाचेच असेल असे दिसते. या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आणि भाजपामधील जागांचे अंतर ११ असू शकते. भाजपाला ३९ टक्के, काँग्रेसला ३६ टक्के, जेडीएस(+) १८ टक्के आणि इतरांना ७ टक्के मते मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, इतर एक्झिट पोलमधून वेगळे भाकीत समोर येत आहे. एखाद्या पोलमध्ये काँग्रेसला तर दुस-या पोलमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र, दोन्ही पक्ष बहुमताच्या आकडेवारीपासून दूर राहतील असा अंदाज आहे. तसेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष कर्नाटकात किंगमेकर होईल व सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे असतील असा अंदाज चाणक्य वगळता जवळपास सर्वच एक्झिट पोलचा आहे. त्यामुळे भाजपाला चाणक्याच्या पोलकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कर्नाटकात सत्ता कुणाची येणार हे १५ रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.