नवी दिल्ली: कर्नाटक, गोवामधील सत्ता संघर्ष थांबण्याचे चिन्हे दिसत नसून आज दिल्लीतील संसद भवन परिसरात कॉंग्रेसने धरणे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सहभागी झाले. कर्नाटकमधील आमदारांना खरेदी करून कॉंग्रेस आणि जेडीएस सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपा करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. प्रत्येक आमदाराला १५० कोटी आणि मंत्रीपद देण्याचे कबूल केले आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
कर्नाटकात बुधवारी काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे बंडखोर आमदार अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले. विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यपाल वजुभाई वाला यांना एच. डी. कुमारस्वामी सरकारला शक्ती परीक्षण करण्याचे निर्देश देण्याचा आग्रह केला. दरम्यान, एम. टी. बी. नागराज आणि डी. सुधाकर या कर्नाटक काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. या बरोबर राजीनामे देणाऱ्या आमदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेल्यास विधानसभेत अध्यक्षांसह पक्षाचे बळ ७९ वरून घटून ते ६६ वर येणार आहे.
गोव्यात कॉंग्रेसचे १५ आमदार होते. त्यात भाजपाने कॉंग्रेसला मोठा धक्का देत, कॉंग्रेसचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावळेकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या १० आमदारांना पक्षात घेतले. गोव्यात आता कॉंग्रेसचे संख्याबळ ५ राहिले आहे.