मुंबई :– कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार कोसळले व फक्त तीन दिवसांत येडियुरप्पा यांना राजीनामा देऊन घरी जावे लागले. ”आपण बहुमत सिद्ध करू”, अशी वल्गना करणारे येडियुरप्पा यांनी शनिवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव न मांडताच राजीनाम्याची घोषणा केली. कर्नाटकात गुरुवारपासून सुरू असलेल्या घोडेबाजारावर पडदा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर लोकशाहीचे शेवटी वस्त्रहरण कर्नाटक विधानसभेतच घडले असते. द्रौपदी अब्रूरक्षणासाठी किंचाळत राहिली असती व सगळेच हतबलतेने हा तमाशा राष्ट्रहित व देशभक्तीच्या नावाखाली उघड्य़ा डोळ्य़ाने पाहत बसले असते. कर्नाटकात भाजप सरकार पडले याचे आम्हास अतीव दुःख होत आहे, पण काँग्रेसमुक्त हिंदुस्थान बनविण्याचा हा मार्ग नाही. अशाने देशात कायदा, व्यक्तिस्वांतत्र्य, वृत्तपत्र व लोकशाहीचा गुदमरून मृत्यू होईल”, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. निवडणुका कशा जिंकल्या जात आहेत व अस्थिरतेच्या काळात सत्ता कशी टिकवली जाते त्याचा हा ‘रामलू पॅटर्न’ चार वर्षे चालला. पण कर्नाटकात रामलू पॅटर्न चालला नाही.
शिवाय, ”लोक घटनेचे स्वामी असतात, घटनेने लोकांवर स्वामित्व गाजवायचे नसते म्हणून घटनेचा आधार घेऊन सरकारला आपला निर्णय लोकांवर लादण्याचा अधिकार नसतो. ही परिस्थिती आज आपल्या देशात दिसत आहे काय?”,असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.