भाजपने दक्षिण मोहिमेच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली

0

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार पुनरागमन केले आहे. बहुमतासाठी आवश्यक 112 जागांपैकी 104 जागांवर भाजपने झेंडा फडकवला आहे. काँग्रेस आणि जेडीएसला मिळालेल्या जागांमुळे त्रिशंकू स्थिती निर्माण होते का काय अशी शक्यता निर्माण होत होती. मात्र भाजपने राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी दावा करण्याची संधी मागण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजप काँग्रेस अथवा जनता दलात मोडतोड करून सत्ता स्थापन करेल हीच शक्यता आहे.

उत्तरेकडून सुसाट सुटलेला भाजपचा वारू दक्षिणेत शिरकाव करण्यात यशस्वी झाला आहे. भाजपला दक्षिणेवर आपले वर्चस्व प्राप्त करायचे आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते सतत आटापिटा करत आहेत. यापूर्वी कर्नाटकाच्या माध्यमातून त्यांना दक्षिणेकडे घुसण्यासाठी तोंड फोडता आले होते. मात्र, पुन्हा काँग्रेसमधील कन्नडिगांनी त्यांना माघारी पिटाळले होते. मात्र, आता परत एकदा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या पदरात यश टाकले आहे. यामुळे दक्षिण मोहिमेच्या यशाची मुहूर्तमेढ रोवण्यात भाजपला आता यश आले आहे. जनमत चाचण्यांचे अंदाज सर्वसाधारणपने त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईन, असा होता.

सत्तास्थापण्यासाठी जनतादल (एस) किंगमेकरच्या भूमिकेत राहील, अशी शक्यता वर्तवली जात होती. तशी काहिशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपला बहुमतासाठी काही जागा कमी पडत आहेत. त्यामुळे सरकार स्थापण्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जेडीएसचा पाठिंबा त्यांना घ्यावा लागेल. भाजप बहुमताचा आकडा गाठू शकली नाही मात्र सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपलाच संधी आहे. या निवडणुकीतील महत्त्वाचे रंगलेले मुद्दे म्हणजे कानडी अस्मितेचे राजकारण, कर्नाटकचा स्वतंत्र ध्वज, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा, मेट्रोमध्ये हिंदीला विरोध, मतांचे ध्रुवीकरण, शेतकरी आत्महत्या, कायदा आणि सुव्यवस्था, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या, कावेरी पाणीवाटपावरून तामीळनाडूशी वाद, भ्रष्टाचार, शहरांमधील अपुर्‍या पायाभूत सुविधा. यावर मोदी-शहा या जोडीने एका बाजूला तर राहूल गांधी यांनी दुसर्‍या बाजूला रान पेटवले होते.

सर्वसाधारण 2014 नंतर निवडणुका या मॅनेजमेंट आणि कम्युनिकेश स्कीलवर लढवल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बर्‍यापैकी यश प्राप्त झाले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मोदी आणि शहा यांनी हिंदीतून भाषण केले आणि ते भाषांतरित करून सांगितले जायचे. परंतु, तरीही ते प्रभावी ठरले आहेत. त्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नापास झाल्याचे दिसत आहे. हे वक्तृत्वाचे स्किल मोदी शहांना चांगलेच अवगत झाल्याचे दिसत आहे. मोदींनी भलेही निवडणूक प्रचारात इतिहासाची मोडतोड केली. त्याची चर्चाही तज्ज्ञांनी केली. मात्र, समोर बसलेल्या लाखोंच्या जनसमुदायास ते भावनिकदृष्ट्या वश करण्यात यशस्वी झाले हे नक्की. भारतीय जनता पक्ष येडियुरप्पांचा चेहरा घेऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरली होती. तरीही त्यांना यश प्राप्त झाले याचाच अर्थ या निवडणुकीने भ्रष्टाचाराचा मुद्दा सपशेल फोल ठरवला आहे. भाजपने लिंगायत समाजाच्या बालेकिल्ल्यात यशाचे शिखर पुन्हा गाठले आहे. बेळगावी, बागलकोटे, हुबळी-धारवाड, विजयपुरा, गडग आणि हवेरी हा लिंगायतबहुल भाग आहे. लिंगायत समाजाचे 50 आमदार या भागातून निवडून जातात. सिद्धरामय्या यांनी ‘लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा द्या आणि अल्पसंख्याक सवलती द्या’ ही मागणी केंद्र सरकारकडे केली होती. ती भाजपने धुडकावली होती. त्याचा परिणाम या भागावर होईल असा अंदाज होताच. पूर्वी हा प्रदेश भाजपचा बालेकिल्ला होता. पण 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसने या भागातून 31 आमदार निवडणून आणले होते. लिंगायत धर्माच्या मुद्द्यावर इथे सिद्धरामय्यांना भरघोस पाठिंबा मिळाल्याचे चित्र आहे. जवळपास 40 पेक्षा जास्ता जागांवर भाजपने यशस्वी आघाडी घेतली. भाजपची लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या मागणीला फेटाळण्याचे तंत्र येथे यशस्वी झाल्याचे दिसते.

कर्नाटकात पार पडलेली विधानसभा निवडणूक 2019 च्या लोकसभा निवडणुकीची क्वार्टर फायनल मानली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात सहा दिवसात 21 सभा घेतल्या, तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या 27 सभा आणि रॅली केल्या होत्या. आता या विजयामुळे 22 राज्यांमध्ये भाजपप्रणीत एनडीएचे सरकार सत्तेवर येणार आहे. भाजप जिंकल्यामुळे पुन्हा एकदा मोदी लाट अजूनही कायम आहे यावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपाने कर्नाटकात आघाडी घेतल्याचे चित्र समोर येताच शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. हे लक्षात घेण्याजोगे आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी बाजार उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिर होता. मात्र, भाजपाने कर्नाटकात आघाडी घेतल्याचे स्पष्ट होताच सेन्सेक्स 256 अंकाच्या वाढीसह 35,812 वर पोहोचला, तर निफ्टी 58 अंकांच्या वाढीसह 10,865 वर पोहोचला. याचाच अर्थ गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यापूर्वी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला होता. याचाच अर्थ मोदींनी या निकालाच्या निमित्ताने आर्थिक उलाढालींवरही आपला प्रभाव निर्माण केला आहे. मतांची टक्केवारी जरी काँग्रेस आणि भाजपमध्ये एकमेकाला घासून असली, तरी एकंदरीत निकालात भाजपने कर्नाटकात भरभरून यश आपल्या पदरात पाडून घेतले आहे. कर्नाटकानंतर आता दक्षिणेतील इतर राज्यांमध्येही पाय रोवण्याचा प्रयत्न पक्षाकडून होईल. तामिळनाडू हे दक्षिणेतील सर्वात मोठे राज्य असून कर्नाटकानंतर आता भाजपा तामिळनाडूला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडूमध्ये परिस्थिती आमच्यासाठी अनुकुल असल्याचे भाजपाने मध्यंतरी म्हटले होते. याचवर्षी त्रिपुरामध्ये विजय मिळवून भाजपाने इशान्य भारतात थाटात प्रवेश केला होता आणि आता दक्षिण भारतातही भाजपाने करिष्मा केला आहे. काँग्रेसने राजकिय खेळी करत जनता दलाला पाठिंबा देवून कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. परंतू तांत्रीकदृष्ट्या त्यांना यश आले नाही. राज्यपालांनी त्यांच्या आधी येडीयुरप्पांना भेटीची संधी दिली त्यामुळे भाजप बाजी मारणार हे निश्‍चित.