बेंगळुरूः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आले आहे. त्यांना कटशह देण्यासाठी भाजपही सज्ज झाला असून कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपालांना भेटून आठ दिवसांची मुदत मागितली आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
येत्या १८ तारखेला शपथ घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला वाट पाहावी लागू शकते. काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून भाजपने प्रतिस्पर्ध्यांची चिंता वाढवली आहे. काँग्रेसने जेडीएसचे नेते कुमारस्वामींना थेट मुख्यमंत्रिपदाचीच ऑफर दिल्याने त्यांनीही लगेचच ती स्वीकारली.
या घडामोडींनंतर, भाजपश्रेष्ठीही कामाला लागले आहे. बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना भेटल्यानंतर आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू, त्यासाठी आम्हाला आठ दिवसांची मुदत हवी, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केलीय. त्यांच्यापाठोपाठ, कुमारस्वामींनीही राज्यपालांची भेट घेतली. काँग्रेस आणि जेडीएसने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे ११८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे असून आता राज्यपाल काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
२२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. यामध्ये भाजपाने १०७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला फक्त ७३ जागांवरच समाधान मानावे लागले. देवेगौडा यांचा जनता दल सेक्यूलर पक्ष ४० जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ११२ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे.