कर्नाटकातील दंगल!

0

जसजशी 12 मे ही तारीख जवळ येऊ लागली आहे, तसतसे कर्नाटकातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. दक्षिण भारताचा उंबरठा असलेल्या कर्नाटकातील 12 मे रोजी होणार्‍या निवडणुकीत भाजपचा विजयाचा अश्‍वमेध आणखी उधळणार की, द्राविडी जनता अमित शहा यांचे स्वप्नहरण करणार याकडे राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष लागले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे हे नक्की. भाजपच्या रणनीतीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटकात 15 रॅली निघणार होत्या. पण राजकीय परिस्थितीचा अंदाज आल्यावर हा आकडा 21 पर्यंत वाढवण्यात आला. याचाच अर्थ भाजपने कर्नाटकात पंतप्रधानांसह सर्वस्व पणाला लावले आहे असा होता. भाजपने कर्नाटकमधील निवडणूक खूपच गांभीर्याने घेतली असल्याचे पाहायला मिळते.देशाच्या नकाशावर नजर टाकली तर उत्तर भारतात कमळ फुलले असल्याचे पाहायला मिळते. देशात 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. आसाम, त्रिपुरा जिंकल्यावर काही उत्तर पूर्व राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. पण एवढ्या सगळ्या विजयी घोडदौडीनंतर ही दक्षिण भारतात मात्र कमळ सत्तेपासून कोसो दूर आहे. त्यामुळे भाजपसाठी कर्नाटकची निवडणूक महत्त्वाची ठरली आहे.

या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींनी प्रचारात रंग आणला नसता तर नवलच होते. अगदी वैयक्तिक पातळीवरही आरोप करण्यात आले. निवडणुकीच्या प्रचारातील ही लढाई अगदी समाज माध्यमांमध्येही ठळकपणे पाहायला मिळाली. त्यात भाजपचा जोर जास्त होता. याचाच अर्थ कुठल्याही परिस्थितीत भाजपला कर्नाटकमध्ये कमळ फुलवायचे आहे. त्याकरिता त्यांनी प्रचारादरम्यान प्लान बी ही अमलात आणला. कर्नाटकमधल्या निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस नाही, तर त्रिकोणाचा तिसरा कोन आहे जद-एस (जनता दल सेक्युलर), माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा पक्ष. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात स्वत: देवेगौडा आणि नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. पण राजकारणात काहीच खरे नसते याचा प्रत्ययही पाहायला मिळाला. एकीकडे देवेगौडा यांनी आपण भाजपविरोधात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांनी त्यांच्यासाठी दरवाजेही उघडे ठेवले होते. प्रचारादरम्यान त्यांनी कुमारस्वामी यांच्यावर आपला विश्‍वास नसल्याचे चित्र निर्माण केले होते. त्याचवेळी मोदी यांनी देवगौडा यांना थेट लक्ष केले होते. बंगळुरूच्या बाहेर असणार्‍या केंगेरी येथे एका प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले की, राजकीय विश्‍लेषक काय बोलत आहे याचा मला फरक पडत नाही. जद- एस राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत त्यांना स्वत:च्या ताकदीवर सत्ता स्थापना करता येणार नाही, ना त्यांना काँग्रेसला बाजूला हटवता येणार नाही. त्यामुळे कर्नाटकमधली समजूतदार जनता जद-एस ला मत देऊन आपले मत वाया घालवणार का? असा थेट प्रश्‍न विचारला होता. याशिवाय निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी अतिरेक्यांशी संधान बाधले असून, त्यांची ही कृती कर्नाटकी जनतेचा विश्‍वासघात करणारी असल्याचा आरोपही केला. केंगेरीमध्ये वोक्कालिंगा समुदायाचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते.

या समुदायावर जद-एसची चांगली पकड आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी याठिकाणी या समाजाला जवळ करण्यापेक्षा जद-एसच्या मतांचे विभाजन करण्याची चाल खेळली असल्याचे बोलले जाते. दरम्यान, देवेगौडा यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याहून अधिक जहाल असल्याचे सांगितले होते. याशिवाय 2014 च्या निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर आल्यामुळे खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. कारण भाजप सत्तेत आल्यावर सभागृहात राहायचे नाही, असे मी आधीपासून ठरवले होते. पण राजीनामा द्यायला गेलो तर मोदींनी मला तसे करण्यापासून थांबवले. देवेगौडा यांच्या अशा परस्परविरोधी वक्तव्यांवरून आवश्यकता भासल्यास सत्ता स्थापन करण्यासाठी ते भाजपला मदत करणार का हे स्पष्ट होत नाही. पण त्या परिस्थितीत देवेगौडा किंगमेकर ठरणार हे नक्की. कर्नाटकमध्ये भाजपने साम दाम दंड भेदाचा वापर करण्यास कसलीच कसर बाकी ठेवली नाही. पण तरीसुद्धा मतदार आपल्याला कितपत स्वीकारतील याचा अंदाज त्यांना बांधता आलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या येडियुरप्पांनी ज्या ठिकाणी मतदार बाहेर पडत नाहीत तिथल्या मतदारांचे हातपाय बांधून त्यांना मतदानासाठी आणण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. बांधून आणलेला मतदार मग भाजपलाच मतदान करेल, हे कशावरून असे त्यांना कोणी सांगितलेले दिसत नाही. राज्यात 17 टक्के लिंगायत समाजाची जनता आहे. हा आकडा कुठल्याही राजकीय पक्षासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे लिंगायत मतांच्या जोरावर भाजपने येडियुरप्पांना राज्याभिषेक करण्याचा घाट घातला आहे. लिंगायत समाजाचे महत्त्व ओळखून अमित शहा आणि राहुल गांधी यांनी लिंगायत मठांचे उंबरठे घासले आहेत. सिद्धरामय्या यांनी तर एक पाऊल पुढे जात या समाजाला वेगळा धर्म आणि अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याची घोषणा केली. काँग्रेसच्या या चालीनंतर भाजपने दुसरी चाल खेळली. काँग्रेसची नाकाबंदी करताना भाजपने धनाढ्य रेड्डी बंधूंना आपल्या छत्रछायेखाली घेतले. या रेड्डीबंधूमधील सुधाकर रेड्डीला भाजपने उमेदवारी दिली नाही. पण त्याचवेळी सुधाकर रेड्डीचे भाऊ करुणाकर रेड्डी आणि सोमशेखर रेड्डी यांच्यासह या परिवारातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपला कुठल्याही परिस्थितीत कर्नाटक जिंकायचेच आहे, हे स्पष्ट होते. कर्नाटक जिंकल्यावर भाजपचे पुढे मिशन केरळ असणार हे नक्की आहे. या छोट्याशा राज्यात भाजपला कधीच संधी मिळालेली नाही.

काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सत्तेची चव चाखायला देणार्‍या या राज्यात भाजप आणि डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्याचे मर्यादेबाहेर रक्त सांडले आहे. एका अंदाजानुसार देवभूमीत भाजपच्या 44, डाव्या पक्षांच्या 45 आणि काँग्रेसच्या 17 कार्यकर्त्यांचे बळी गेले आहेत. त्यामुळे मिशन केरळसाठी कर्नाटक जिंकणे भाजपसाठी खूपच महत्त्वाचे आहे. डाव्याआघाडीकडून केरळ हिसकावून घेतल्यास त्रिपुरा जिंकल्याच्या आनंदापेक्षा खूप जास्त आनंद भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या छोट्या कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय नेत्यांना होईल. एकदा का कर्नाटक आणि केरळ भाजपच्या अमलाखाली आले की अमित शहा आणि नरेंद्र मोदी दोघेही म्हणू शकतात, भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे स्वप्न जवळ जवळ साकारले गेले आहे.

– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117