कर्नाटकातील निवडणुका होताच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

0
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. २४ एप्रिल म्हणजे १९ दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर 21 पैसे वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने ही दर वाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.
मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ८२.६५ रुपये, दिल्लीमध्ये ७४.८० रुपये, कोलकाता ७७.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ७७.६१ रुपये प्रतीलिटर झाले आहेत. या दर वाढीमुळे डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. तर पेट्रोलने देखील 56 महिन्यांमधील सर्वाधिक दर नोंदवला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन आठवडे असताना पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते. मात्र त्यानंतर गेले तीन आठवडे इंधनाच्या दरांमध्ये बदल झाला नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींप्रमाणे बदलत राहतात. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्याच्या 19 दिवसांपासून या दरांमध्ये कोणाताही बदल झाला नव्हता. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमतींनुसार पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये बदल न झाल्याने इंधन कंपन्यांचे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले. याच काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याचा फटकादेखील इंधन कंपन्यांना बसला. 24 एप्रिलला पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते. मात्र यानंतर 19 दिवस दरांमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. या 19 दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर प्रति बॅरल 74.84 डॉलरवरुन 82.93 डॉलरवर पोहोचले.