श्रीनगर – भारतीय सैन्याची कामगिरी नेहमीच अभिमानास्पद असते. आज पुन्हा एकदा भारतीय सैन्याने कौतुकास्पद आणि प्रत्येक नागरिकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. दहशतवाद्यांच्या छुप्या कारवाईंनी ग्रासलेल्या काश्मीर खोऱ्यातील ‘बारामुल्ला’ हा जिल्हा दहशतवादमुक्त करण्यात सैन्याला यश आले आहे.
जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला हा पहिलाच जिल्हा असल्याचे सांगण्यात येत आहे. काल बुधवारी २३ रोजी बारामुल्लामध्ये तीन दहशवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर भारतीय लष्कराकडून या जिल्ह्याला दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दशकभरापासून दहशतवाद्यांच्या छुप्या कारवाया सुरूच आहेत. तर, पाकिस्तानकडून त्याला खतपाणी घालण्यात येत असल्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यातून दिसून आले. मात्र, भारतीय सैन्याने या दहशतवादी कारवायांना चांगलाच प्रत्युत्तर दिली. सैन्याने बारामुल्ला जिल्हा दहशतवादीमुक्त केला असून आता काश्मीर खोऱ्यातील एक-एक दहशतवादी ठार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय लष्कराने मोहीम हाती घेतली आहे. दहशतवादाविरोधातील भारतीय लष्कराच्या मोहीमेला मिळालेले हे मोठे यश आहे.