श्रीनगर-काश्मिरच्या खोऱ्यामध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले आहे. राजनाथ सिंह सध्या दोन दिवसांच्या जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. श्रीनगरमध्ये स्पोर्ट्स कॉनक्लेव्हमध्ये बोलताना राजनाथ म्हणाले की खेळ तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतील. मुलांना चुकीच्या वाटेवर नेणे सोपे असते , आणि हे सत्य आम्हाला माहित असल्यामुळेच अल्पवयीन मुलांविरोधातील दगडफेकीसंदर्भात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
विकासाची संधी मिळेल
या प्रसंगी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती उपस्थित होत्या. जम्मू व काश्मिरमधल्या मुलांनाही देशातल्या अन्य राज्यांप्रमाणे त्यांना विविध संधी आणि चांगले वातावरण मिळायला हवे ते झाले तर दगडफेकीच्या घटना, बाँबस्फोट व गोळीबाराच्या घटना थांबतील व मुलांना विकासाची संधी मिळेल असे मुख्यमंत्री मेहबुबा म्हणाल्या.
मुलांमध्ये प्रचंड क्षमता
इथल्या मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे परंतु सध्या ते अंधारात असल्याचे सांगत केंद्र व राज्य सरकार मिळून परिस्थिती बदलेल असे आश्वासन त्यांनी दिले. मुफ्ती मेहबुबा यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये राजनाथ सिंह संध्याकाळी सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच ते लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.मुलांमध्ये प्रचंड क्षमता