ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत कासवा, सांगवी, चिंचोली ग्रामपंचायती बिनविरोध

पाच जागांकरिता १२ उमेदवार रिंगणात

यावल प्रतिनिधी ।

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत प्राप्त १८ अर्जापैकी माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी माघार घेतली. तसेच यात कासवा, सांगवी बुद्रुक व चिंचोली येथील प्रत्येकी एक जागा बिनविरोध ठरली. उर्वरीत पाच ग्रामपंचायतीच्या पाच जागांकरिता १२ उमेदवार रिंगणात आहे. या सर्व पाच जागांकरिता गुरुवारी, १८ मे रोजी मतदान होणार आहे.

यावल तालुक्यातील विविध कारणाने रिक्त असलेल्या १२ ग्रामपंचायतीमधील १४ सदस्यांच्या जागेवर पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सात ग्रामपंचायतींच्या आठ जागांकरीता २० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. तर छानणीत दोन अर्ज अवैद्य ठरल्यावर १८ वैध अर्जापैकी सोमवारी माघारीच्या दिवशी मुदतीत तीन उमेदवारांनी माघार घेतली व माघारीनंतर कासवा ग्रामपंचायतीत संगीता किशोर तायडे, चिंचोलीमधून सपना पन्नालाल कोळी व सांगवी बुद्रुक मधून शबनम फिरोज तडवी हे तीन उमेदवार बिनविरोध ठरले आहे.

आता कासवा ग्रामपंचायतीच्या एक जागेकरीता तीन, बामणोद एका जागेकरीता दोन, बोरखेडा बुद्रूक एक जागेकरिता दोन, मारूळ एका जागेकरीता दोन व दहिगाव एका जागेकरीता ती असे पाच ग्रामपंचायतीच्या पाच जागेकरीता १२ उमेदवार रिंगणात आहेत.

तहसील कार्यालयात माघारीनंतर चिन्ह वाटप करण्यात आले. संपूर्ण कामकाज तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जगताप, बबिता चौधरी, एच. एम. तडवी, जी. टी. सोनवणे, सुयोग पाटील, स्मिता कोळी, प्रवीण पाटील, विलास नागरे, टी. सी. बारेला यांनी पाहिले.