श्रीनगर-एकीकडे जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असताना जम्मू काश्मीरचे नवे उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी मात्र ही किरकोळ घटना असल्याचं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या काही तासातच त्यांनी हे वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला आहे.
आधीच आरोपींच्या समर्थनार्थ रॅलीत भाजपाचे दोन मंत्री सामील झाल्याने जम्मू काश्मीर सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात कविंदर गुप्ता यांनी हे वक्तव्य करत अडचणी कमी करण्याऐवजी त्यात भर टाकली आहे.
दरम्यान वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर स्पष्टीकरण देतना कविंदर गुप्ता यांनी म्हटलं आहे की, ‘कठुआ प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. वारंवार तो विषय काढणं चांगली गोष्ट नाही. या प्रकरणाला वारंवार समोरं आणं योग्य नाही. अशी अनेक प्रकरणं असून जाणुनबुजून ते वाढवलं जाऊ नये असंच मला म्हणायचं होतं’.