बीसीसीआयची घोषणा; वर्ल्ड कपसाठी केदार जाधव फिट !

0

मुंबई: वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यात केदार जाधवची निवड करण्यात आली आहे. मात्र वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही यावर तर्कवितर्क मांडले गेले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर केदार जाधवला दुखापत झाली. त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता बीसीसीआयने आज शनिवारी केदार वर्ल्ड कपला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्यामुळे भारतीय संघावरील मोठे दडपण कमी झाले.

केदार हा भारतीय संघासोबतच म्हणजे 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. केदारला तंदुरुस्त करण्यासाठी फरहार्ट ऑस्ट्रेलियाहून लवकर परतले आणि त्यांनी केदारला लवकरात लवकर बरे केले. दुखापतीमुळे केदारला आयपीएल स्पर्धेच्या प्ले ऑफ सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. केदारने तंदुरुस्ती चाचणी पास केली. केदारच्या तंदुरुस्त होण्याणे भारताच्या मधल्या फळीची चिंता मिटल्याचे बोलले जात आहे. केवळ फलंदाजीतच नव्हे, तर केदार गोलंदाजीतही संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्याने 59 वन डे सामन्यांत 43.48च्या सरासरीने 1174 धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर 27 विकेट्सही आहेत. भारतीय संघ 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. 5 जूनला भारत वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

अष्टपैलू खेळाडू केदारला खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीप स्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. निकोलस पूरणने टोलावलेला चेंडू अडवण्यासाठी केदारने डाइव्ह मारली. केदारने चेंडू अडवला, परंतु खांदा दुखावल्याने तो मैदानावर तसाच उभा राहिला. त्यानंतर जाधवने मैदान सोडले. संपूर्ण सामन्यात जाधव नंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही.