डेहराडून- सुशांत सिंग राजपूत आणि सैफ अली खान, अमृतासिंग यांची मुलगी सारा अली खान यांचा ‘केदारनाथ’हा चित्रपट अडचणीत सापडण्याची चिन्हे आहे. टीजर रिलीज होताच, या चित्रपटाने वाद ओढवून घेतला आहे. टीजर पाहिल्यानंतर उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजा-यांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
‘केदारनाथ’ हा चित्रपट हिंदुंच्या भावना दुखावणारा आहे, असा दावा या पुजा-यांनी केला आहे.
केदार सभा या केदारनाथ मंदिरातील पुजा-यांच्या संघटनेचे अध्यक्ष विनोद शुक्ला यांनी या चित्रपटाविरोधात आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा आहे. हिंदूंच्या भावना दुखावणा-या या चित्रपटावर बंदी लादली जावी अन्यथा आम्ही रस्त्यांवर उतरू, असे शुक्ला यांनी म्हटले आहे. रूद्रप्रयागच्या जिल्हा मुख्यालयासमोर या चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आले.