नवी दिल्ली – पीडब्ल्यूडीमध्ये झालेल्या १० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात साधारणपणे एक वर्षानंतर केजरीवाल यांच्या भाचाला अटक करण्यात आली. विनय बंसल असे त्याचे नाव आहे. एसीबीने कारवाई करत त्याला अटक केली. विनय बंसल याच्या अटकेची पुष्टी खुद्द शाखेचे विशेष आयुक्त अरविंद दीप यांनी केली आहे. हा घोटाळा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बहिणीचा पती सुरेंद्र बंसल यांनी केल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. त्यांनी पीडब्ल्यूडीच्या नावाने कामे घेतली आणि कामे न करताच खोटी बिले लावून सरकारकडून पैसे घेतले, असेही त्यांनी म्हटले होते.
एसीबीने केली अटक
याप्रकरणी एसीबीने तीन एफआयआर दाखल केल्या आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र बंसल होते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मात्र तरीही एसीबी आपला तपास करतच होती. विशेष आयुक्त अरविंद दीप यांनी ईनाडु इंडियासोबत बोलताना सांगितले, की या घोटाळाप्रकरणी एसीबीने सुरेंद्र बंसल यांचा मुलगा विनय बंसल याला अटक केली आहे.