मुंबई (राजा आदाटे) । सव्वा दोन वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुबळ यांची जामिनावर झालेली सुटका आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातील गैरव्यवहारात मिळालेली क्लीन चीट या दोन्ही घटना चार दिवसांच्या अंतराने घडल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी वर्गात समाधानाचे वातावरण तयार झाले असून, निराश झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे चैतन्य निर्माण झाले आहे.
ओबीसींच्या संतापाची काढली हवा
दोन्ही घटनांमुळे राज्यातील ओबीसी राजकारणाला नवी चालना मिळणार आहे. या दोन नेत्यांवर केवळ ओबीसी असल्यामुळे जाणीवपूर्वक अन्याय झाला, अशी भावना ओबीसी समाजात आहे. त्याचा फटका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणात बसण्याची चिन्हे होती. त्या संतापाची हवा काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे आता बोलले जात आहे.
खडसेंचे जूनमध्ये पुनर्वसन
या दोन प्रभावशाली नेत्यांची कोंडी झाल्यावर भाजपच्या आश्रयाला धावलेल्या संधीसाधू नेत्यांचे आता धाबे दणाणले आहे. दोघांना दिलासा मिळाल्यामुळे ते आता गप्प राहणार नाहीत. खडसे तर अधिक आक्रमक होतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच खडसेंचे पुनर्वसन होण्याची चर्चा आता भाजपच्या वर्तुळात सुरू झाली असून, उत्तर महाराष्ट्राचे राजकारण हळूहळू तापू लागले आहे.