खान्देश पापड महोत्सव २०२३ उत्साहात

| जळगाव प्रतिनिधी ।

येथील जळगाव जनता सहकारी बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आयोजित महिला बचतगट खान्देश पापड महोत्सव लेवा बोर्डिंग सभागृहात दि. १५ एप्रिल ते १७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सवाचा आज समारोप झाला. महोत्सवात जळगाव, भुसावळ, यावल, चिखली बोदवड, अमळनेर येथील विविध ५० बचत गटांनी सहभाग घेतला होता.

पापड महोत्सवात विविध प्रकारचे पापड, बिबड्या, कुरडया इ. विक्रीस होते. महोत्सवात बचत गटांच्या उत्पादनांची सुमारे १२ ते १५ लाखांची विक्री झाली. ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या मालाला बँकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खान्देश पापड महोत्सवामुळे बाजारपेठ उपलब्ध झाली. तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे पापड बिबड्या, कुरड्या उपलब्ध झाल्याने अनेक ग्राहकांनी बँकेच्या उपक्रमाबाबत कौतुक व समाधान व्यक्त केले.