‘किंग खान’ पुन्हा बनला ‘बादशाह’, शाहरुख खान जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती

जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरूख खान पहिला

Shahrukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान सर्वत्र राज्य करत आहे. त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला आहे. भरघोस कमाईसोबतच त्याच्या चित्रपटाचे कौतुकही झाले आहे. यानंतर शाहरुख खानला आणखी एक मोठे यश मिळाले. जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरूख खानने पहिला क्रमांक पटकावला आहे.

टाइम मासिकाच्या २०२३ च्या १०० जणांच्या यादीत अभिनेता शाहरुख खानने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने फुटबॉलपटू लायोनल मेस्सी, ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन मर्केल, ऑस्कर विजेती मिशेल यो आणि मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. या यादीसाठी जवळपास १२ लाख वाचकांनी मतदान केले होते. त्यापैकी चार टक्के मते किंग खानला मिळाली आहेत.

या यादीत दुसरा क्रमांक इस्लामी शासनपद्धतीत अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा देणाऱ्या इराणी महिलांना मिळाला आहे. या नावांशिवाय ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचाही या यादीत समावेश आहे.

 

शाहरुख खानसाठी हे वर्ष खूप चांगले ठरत आहे. त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटाचे जगभरातून कौतुक झाले. शाहरुख खान एक असा बॉलिवूड सुपरस्टार आहे ज्याची फॅन फॉलोइंग फक्त भारतातच नाही तर तो जगभरात प्रसिद्ध आहे.