यावल- तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय तरूणाचा नाशिक येथील गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. राहुल जगन्नाथ वराडे असे मृत युवकाचे नाव आहे.
किनगाव बुद्रुक, ता.यावल येथील रहिवासी जगन्नाथ महिपत वराडे यांचा एकुलता एक मुलगा राहूल वराडे हा काही महिन्यांपासून नाशिक येथे खाजगी कंपनीत काम करीत होता.
मंगळवारी महाराष्ट्र दिनाची सुटी असल्याने तो आपल्या मित्रांसोबत नाशिक जवळील गंगापूर धरणात पोहण्यास गेला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर राहुलच्या मित्रांनी ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली.
राहुल जवळील आधारकार्डवरून फैजपूरचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते यांनी किनगावचे माजी सरपंच मिलींद चौधरी यांना याबाबत माहिती दिली. तेव्हा राहुल किनगावातील जगन्नाथ वराडे यांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह धरणातून काढण्यात आला असुन शवविच्छेदनानंतर बुधवारी तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. मृत युवक हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील एक विवाहित बहिण असा परीवार आहे.