राजस्थान :- राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी आज (मंगळवार)चा सामना म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. सततच्या पराभवामुळे राजस्थानचा संघ अगदी तळाशी जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकणे राजस्थानला अत्यावश्यक बनले आहे. इंदूर येथे दोनच दिवसांपूर्वी पंजाबकडून पराभूत झाल्यानंतर राजस्थानला पुन्हा त्यांच्याशी लढायचे आहे.
राजस्थान चागल्या कामगिरीची आस लावून बसला आहे. गुणपत्रिकेत आपले स्थान निश्चित करण्यासाठी संघाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. राजस्थान रॉयल्सने जयपूरच्या घराच्या मैदानावर तीन पैकी दोन सामने जिंकले आहे. निदान आज तरी या मैदानावर राजस्थान चांगली कामगिरी करण्याची आस लावून बसला आहे.दुसरीकडे पंजाबचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. त्यांची सलामीची जोडी कमालीची यशस्वी झाली असून लोकेश राहुल आणि ख्रिस गेलपैकी किमान एक जण तरी खेळपट्टीवर धावा करत आहेत. करुण नायर आणि मार्कस स्टोइनीस फलंदाजीत उपयुक्त योगदान देत आहेत. त्याशिवाय गोलंदाजीतही कर्णधार रवीचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या संघाने चमक दाखवली असल्याने त्यांचे पारडे निश्चितच जड दिसते