परवानगी नाकारल्यानंतरही किसान सभेचा लाँग मार्च

अहमदनगर l

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखेर अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथून दुपारी तीनच्या सुमारास किसान सभेचा लाँग मार्च कूच लोणीकडे झाला. पोलिसांनी आंदोलकांना १४९ ची नोटीस बजावत परवानगी नाकारली. मात्र, शेतकऱ्यांचा निर्धार कायम आहे. खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. हे पाहता वाढलेल्या उन्हापासून दक्षता म्हणून पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली. मात्र, वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यास मार्च स्थगित करायला आंदोलक तयार असल्याची माहिती प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

अवकाळी पावसाने उभ्या महाराष्ट्राला झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी फळबागा मातीमोल झाल्या. आंब्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. ही भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे. गायरान जमीन, दूध धोरण, दूध एफआरफी समितीचे न झालेले गठण, दूध आयातीला विरोध अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. यात किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्यासह राज्यातले हजारो शेतकरी सहभागी झालेत.

एकमताने निर्णय घेतला

किसान सभेचे अजित नवले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पोलिस शेतकऱ्यांचे दुश्मन नाहीत. ते त्यांचे काम करत आहेत. ज्याची उभी हयात उन्हात काम करताना जाते, त्या शेतकऱ्यांची आज सरकारला चिंता वाटते आहे. काद्याला तीनशेचा भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी उन्हाळ गाळलेल्या घामाला आज किंमत नाही. आम्हालाही त्यांची चिंता आहे. त्यामुळे दुपारी तीनंतर आम्ही चालू. रात्रीही चालू. अधिकारी, मंत्र्यांच्या बैठकात गांभीर्य नसते. त्यामुळे आम्ही एकमताने हा मोर्चा काढत असल्याचे त्यांनी सांगितले.