बांधकाम व्यवसायाला ‘अच्छे दिन’ सुरु; कोलते पाटील यांच्या प्रकल्पात हिंजवडीमध्ये होणार गुंतवणूक
पुणे : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या दुर्देवी निर्णयानंतर तसेच लागोपाठ वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि रेरा कायदा लागू केल्यानंतर मोठ्या अडचणीत सापडलेला पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध डीएसके बिल्डर्स प्रा. लि. कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर त्याचा परिणाम इतरही बांधकाम व्यावसायिकांवर झाला होता. परंतु, जगप्रसिद्ध गुंतवणूक संस्था केकेआरने पुण्यात 193 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले असून, प्रसिद्ध बिल्डर कोलते पाटील यांच्या हिंजवडीतील बहुचर्चित अॅट लाईफ रिपब्लिक या प्रकल्पात ही गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पात कोलते पाटील यांच्यासह आयसीआयसीआय बँकदेखील आपली गुंतवणूक करत असून, प्रकल्प कोलते पाटील बिल्डर्स पूर्ण करणार आहेत. गेल्या सहा महिन्यापासून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील बांधकाम व्यावसाय ठप्प असून, त्यामुळे या क्षेत्रातील कामगार व तंत्रज्ञांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळलेली आहे. या गुंतवणुकीमुळे या क्षेत्राला अल्पसा का होईना दिलासा मिळाला असल्याचे सूत्राने सांगितले.
हिंजवडीमध्ये 383 एकरात टाऊनशीप
कोलते पाटील डेव्हलपर्सच्या सूत्राने सांगितले, की जागतिक गुंतवणूकदार संस्था केकेआरने पुणेस्थित हिंजवडी आयटी क्षेत्रातील अॅट लाईफ रिपब्लिक या प्रकल्पात 193 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पात कोलते पाटीलसह आयसीआयसीआय बँकदेखील गुंतवणूक करणार आहे. हा बहुप्रतीक्षित प्रकल्प असून, त्यामुळे आयटी हबच्या गृहप्रकल्पात महत्वपूर्ण भर पडणार आहे. या गुंतवणुकीबाबतची कायदेशीर प्रक्रियाही जवळपास पूर्ण होत आली आहे. कोलते पाटील डेव्हलपर्स हिंजवडीमध्ये जवळपास 383 एकर परिसरात ही टाऊनशीप उभी करत आहेत. या टाऊनशीपसाठी ही गुंतवणूक वापरली जाणार आहे. कर्जस्वरुपात होणार्या या गुंतवणुकीमुळे पुण्यातील बांधकाम क्षेत्राला थोडा का होईना हातभार लागणार आहे.
मध्यमवर्गीयांसाठी चांगली घरे देणार
आयटी पार्क म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीतील अॅट लाईफ रिपब्लिक या प्रकल्पात संपूर्ण सोयीसुविधा राहणार आहेत. या भागातील डिजिटल इकॉनॉमी वर्कफोर्सला नजरेसमोर ठेवून हा गृहप्रकल्प साकरला जाणार आहे. मध्यमवर्गीय उत्पन्न घटकालाही या भागात चांगले घर विकत घेता यावे, यासाठी हा प्रकल्प साकरला जात असून, केकेआरसह आयसीआयसीआय बँकेचेदेखील अर्थसहाय्य या प्रकल्पात लाभणार असल्याचे कोलते पाटील डेव्हलपरचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल सारडा यांनी सांगितले.