कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेट्स राखून शानदार विजय मिळवला आहे. कर्णधार दिनेश कार्तिकने घरच्या मैदानावर शानदार षटकार ठोकून राजस्थान संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानने १४२ धावांचे आव्हान कोलकाता समोर ठेवले होते. कोलकात्याच्या कुलदीप यादवने ४ बळी मिळवत राजस्थानच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याच्या ख्रिस लिन आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी सुरेख फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करत राजस्थानला १९ षटकांत १४२ धावांवर पॅव्हेलियन गाठावे लागले. राजस्थानकडून जोस बटलरने २२ चेंडूत ३९ धावांची आक्रमक सुरुवातीत केल्यानंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे राजस्थानचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने १८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात सलामीवीर क्रिस लीनसह (४५) कर्णधार दिनेश कार्तिक (नाबाद ४१) आणि आंद्रे रसेलने (नाबाद १०) मोलाचे योगदान दिले. त्यामुळे कोलकाता संघाला घरच्या मैदानावर विजयश्री खेचून आणता आली. राजस्थानच्या बेन स्टोक्सने धारदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले. मात्र त्याला पराभव टाळता आला नाही.
या विजयाने आता कोलकाता संघाचे १४ गुण झाले आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघ १२ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.