‘मेट्रो ४’ मार्गिकेतील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाचा मार्ग मोकळा

मुंबई: ‘वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेवरील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या स्थानकाच्या कामासाठी लागणारी विक्रोळीतील गोदरेजची सुमारे १६ हजार चौरस मीटर जागा लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात येणार आहे. या जागाचा ताबा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

मुंबई – ठाणे प्रवास वेगवान व्हावा यासाठी एमएमआरडीएने ३२.३२ किमी लांबीची मेट्रो मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला असून या मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. हे काम २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. असे असताना या मार्गिकेतील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकाच्या उभारणीसाठी विक्रोळीतील १६ हजार चौरस मीटर जागा एमएमआरडीएला हवी होती. ही जागा गोदरेजच्या मालकीची असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीएला बरीच कसरत करावी लागली असती. पण आता मात्र ही जागा संपादित करणे एमएमआरडीएसाठी सोपे झाले आहे. या जागेच्या संपादनाची प्रक्रियाही एमएमआरडीएने सुरू केली आहे. महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी याला दुजोरा दिला.

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागा संपादनाविरोधातील गोदरेजची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निर्णयाचा फायदा आता एमएमआरडीएलाही होत आहे. लक्ष्मीनगर मेट्रो स्थानकासाठी गोदरेजची जागा हवी आहे. या निकालानंतर एमएमआरडीएने विक्रोळीतील सुमारे १६ हजार चौरस मीटर जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ही जागा आमच्या ताब्यात येईल आणि मेट्रो स्थानकाच्या कामाला सुरुवात होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.